अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून १६४.५२ कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचे समोर आले आहे. दरमहा १५०० रुपयांच्या हिशोबाने अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील वर्षभरात ही रक्कम जमा झालेली आहे.
माहिती अधिकारात समोर आलेल्या या धक्कादायक माहितीनुसार या अपात्र लाभार्थ्यांमध्ये १२ हजार ४३१ पुरुषांचाही समावेश आहे. या अपात्र पुरुषांच्या बँक खात्यात मागील १३ महिने दरमहा १५०० रुपयांप्रमाणे २५ कोटी रुपयांच्या घरात रक्कम जमा झाली आहे. तर, अपात्र महिलांचा आकडा ७७ हजार इतका असून, त्यांना १२ महिन्यांपर्यंत ही रक्कम मिळाली असून, तो आकडा १४० कोटी रुपयांच्या घरात आहे. या योजनेतील निकषांना डावलून २४०० सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे यापूर्वी समोर आले होते.
वसुली करणार का…?
खोटी माहिती देऊन चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेणाऱ्या या लाभार्थ्यांना यापुढे सरकार या योजनेचा लाभ देणार नाही. मात्र, त्यांच्याकडून सरकारने वसुलीसाठी प्रयत्न केलेला नाही किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केलेली नाही. विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांवरही सरकारने काहीच कारवाई केलेली नाही.
सध्याच्या घडीला २.४१ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असून, तिजोरीवर दरमहा ३४०० कोटींचा भार पडत आहे. आतापर्यंत महिला व बालकल्याण विभागाने २६.३४ लाख संशयित खाती वगळली आहेत. जसजशी पडताळणी होईल तसतशी अपात्र लाभार्थ्यांची संख्याही वाढू शकते.