आजपासून पावसाचा जोर वाढनार, या तारखेपर्यंत राज्यात वादळी पाऊस…
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, आज, २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा जोर वाढणार आहे. दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील. आज ज्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, त्यांत प्रामुख्याने यवतमाळ, नांदेड, वाशिम, परभणी, जालना, बीड, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि मुंबईसह संपूर्ण कोकण पट्टा यांचा समावेश आहे.
आजच्या पावसापेक्षा उद्या, २५ ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीन विभागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीय राहील. उद्यापासून पावसाचा जोर वाढणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, लातूर, जालना, बीड, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि इगतपुरीपासून मुंबईपर्यंतचा संपूर्ण कोकण पट्टा यांचा समावेश असेल.
या तुलनेत पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, इथे फक्त तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांच्या पेरण्या अजून बाकी आहेत, त्यांनी या पावसानंतर लगेच पेरण्या सुरू करायला हरकत नाही. ज्या भागात पाण्याची सोय नाही, त्या शेतकऱ्यांनी आताच पेरणीची कामे सुरू करावीत, कारण या पावसामुळे शेतात चांगला ओलावा निर्माण झाला आहे. पाणी वाहून जाणाऱ्या भागात पाण्याचा निचरा होऊन जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होईल.
हा सध्याचा अवकाळी पाऊस हा या हंगामातील शेवटचा मोठा पाऊस असू शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होईल. नोव्हेंबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही, परंतु महिन्याच्या अखेरीस (शेवटच्या आठवड्यात) हवामानात थोडाफार बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या चारही विभागांमध्ये या काळात चांगला पाऊस पडेल, मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस भाग बदलून पडेल आणि सर्वदूर पडणार नाही असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.










