मोंथा चक्रीवादळाने काल रात्री आंध्र प्रदेशात किनारी भागाला धडक दिली. त्यानंतर त्याचे रुपांतर अतितीव्र कमी दाब क्षेत्रात झाले. ही प्रणाली आंध्र प्रदेशातून दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने वाटचाल करत आहे.त्यामुळे विदर्भ आणि महाराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजे आहे.
मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशात जमिनीवर आले आहे. आज सकाळी या चक्रीवादळाचे रुपांतर अतीतीव्र कमी दाब क्षेत्रात झाले आहे. मागील ६ तासांपासून ही प्रणाली १५ किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने वाटचाल करत आहे. हे कमी दाब क्षेत्र भद्राछलामपासून ५० किलोमीटर दक्षिण नैऋत्येला, तर तेलंगणातील खम्ममपासून ११० किलोमीटर पुर्वेला,ओडिशातील मलकनगरीपासून दक्षिण नैऋत्येला १३० किलोमीटर तसेच छत्तीसगडमधील जगदालपूर येथून २२० किलोमीटर दक्षिण नैऋत्येला २२० किलोटीर अंतरावर होते. ही प्रणाली उत्तर-वायव्येकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या शेजारून तसेच दक्षिण छत्तीसगड भागातून जाण्याची शक्यता आहे. पुढील ६ तासात याची तीव्रता कमी होऊन कमी दाब क्षेत्रात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्हे आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्या तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, शिवाय मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज देण्यात आला.
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मात्र राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.