नोव्हेंबरमध्येही पुन्हा चक्रीवादळ, पावसाचा मुक्काम वाढला..तोडकर
तोडकर हवामान अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता वाढणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि वाशिम, अकोला येथे पाऊस सक्रिय राहील. तसेच, सांगली, सातारा, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये मध्यम ते दमदार पावसाची शक्यता आहे.
२९ ऑक्टोबर (बुधवार) हा दिवस जोरदार पावसाचा असेल. या दिवशी जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ आणि हिंगोली-वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधारचा इशारा देण्यात आला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव ३१ ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात राहणार आहे. (तोडकर हवामान अंदाज)
दरम्यान, २ आणि ३ नोव्हेंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून आणखी एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज तोडकर यांनी व्यक्त केलाय..
पाऊस आणि थंडीच्या बाबतीतही बदल अपेक्षित आहेत. साधारणतः ६ आणि ७ नोव्हेंबरपासून मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि खान्देशात थंडी जाणवण्यास सुरुवात होईल. तथापि, ही थंडी लगेचच प्रभावी होण्याची शक्यता कमी आहे…
कारण ५-६ नोव्हेंबरच्या सुमारास नवीन चक्रीवादळामुळे पुन्हा ढगाळ हवामानाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकदा ही पावसाळी परिस्थिती पूर्णपणे निवळल्यावर थंडी दीर्घकाळ आणि चांगल्या पद्धतीने राहण्याचा अंदाज आहे. थंडीमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या तापमानात लक्षणीय बदल जाणवेल, तसेच दिवसाचे तापमानही कमी राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यासारख्या पावसाची तीव्रता नोव्हेंबरच्या ५-७ तारखेनंतर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.