पाउस घेनार निरोप, थंडीची लाट येनार.. या तारखेनंतर पुन्हा पाऊस – तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज ; आज, ३ नोव्हेंबर रोजी, कोकण किनारपट्टीवर दुपारनंतर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तुळजापूर, सातारा, नाशिकचा काही भाग, नांदेड, जालना, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, धुळे, नंदुरबार, शहादा आणि बुलढाणा येथे तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्रातील पावसाची व्याप्ती आता कमी होऊ लागली आहे. आज ही घट १०% ते २०% असेल आणि उद्या, ४ नोव्हेंबरला ती ५०% पर्यंत कमी होईल, ज्यात खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. या दिवशी केवळ नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड पट्ट्यात आणि मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरणामुळे पाऊस राहू शकतो अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.
पावसाची सर्वात मोठी समाधानाची बातमी म्हणजे ५ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत विदर्भ आणि खानदेश पूर्णपणे (१००%) पावसापासून मुक्त होतील. त्याच दिवशी महाराष्ट्रातील जवळपास १५ जिल्हे पावसातून बाहेर पडतील. फक्त ४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबरची सकाळ थोडीफार किचकट राहू शकते. दक्षिण महाराष्ट्रात (सांगली-सोलापूर) ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस राहू शकतो, परंतु त्यानंतर तो पूर्णपणे निघून जाईल.
याच काळात, ५ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून मध्य प्रदेशात थंडीचे आगमन होईल, आणि महाराष्ट्रात ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून मराठवाडा, खानदेश आणि विदर्भामध्ये थंडीचा प्रादुर्भाव जाणवायला सुरुवात होईल. ७ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढेल. (तोडकर हवामान अंदाज)
येणारी थंडी किमान १० ते १५ दिवस टिकेल, कारण उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा थंडावा आणि दाब वाढणार आहे. पुढील १५ दिवसांत महाराष्ट्रावर कोणतेही मोठे चक्रीवादळ येण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांसाठी ९ आणि १० नोव्हेंबर या तारखा हरभरा आणि गहू पेरणीसाठी चांगल्या असतील, कारण या काळात थंडीमुळे सकाळी शेकल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती असेल.
नोव्हेंबर महिन्यात १६-१७ तारखेला थंडीत धुके वाढेल आणि २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पुन्हा पावसासारखे वातावरण होण्याची शक्यता आहे, पण सध्याच्या थंडीमुळे त्याचा जोर वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या महिन्यात मोठी धोक्याची घंटा नाही, असे तोडकर यांनी हवामान अंदाजात नमूद केले आहे.