पावसाचा निरोप आणि थंडीला सुरुवात कधी ? पंजाब डख यांचा नवीन अंदाज
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुरू असलेला परतीचा पाऊस आता लवकरच निरोप घेणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा पाऊस २ नोव्हेंबर पासून ते ५ नोव्हेंबर पर्यंत वेगवेगळ्या तारखांना तुरळक स्वरूपात राहील. हा पाऊस सर्वदूर नसेल, तर तो भाग बदलत, विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. ७ नोव्हेंबरपासून राज्याच्या बहुतांश भागातून पाऊस पूर्णपणे थांबणार असून, यानंतर मोठे हवामान बदल अपेक्षित नाहीत. हा परतीच्या पावसाचा शेवटचा टप्पा असल्याचे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
जाता-जाता ईथे पाऊस नंतर थंडीचे आगमन
हा पाऊस निरोप घेण्यापूर्वी परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, यवतमाळ आणि वाशिम यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जाता-जाता जोरदार पावसाची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर नंतर पाऊस कमी होताच राज्यात थंडीचे आगमन होणार आहे. थंडीची सुरुवात ५ नोव्हेंबरच्या आसपास उत्तर महाराष्ट्रातून (नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव) आणि विदर्भातील काही भागांत (बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर) जाणवेल. त्यानंतर थंडीचा जोर हळूहळू दक्षिणेकडे सरकेल. (पंजाब डख)
थंडीचा हा प्रवाह वाढत जाऊन ६ नोव्हेंबरपर्यंत तो अहमदनगर, जुन्नर, आंबेगाव, संभाजीनगर, जालना, परभणी या मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये पसरेल. ७ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा जोर दक्षिणेकडील जिल्ह्यांपर्यंत (लातूरपर्यंत) पोहोचेल आणि ८ नोव्हेंबरपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडी चांगलीच जाणवेल. या काळात म्हणजेच ४, ५ आणि ६ नोव्हेंबरला वातावरणात धुई आणि धुकं देखील अनुभवायला मिळेल.
पेरणी कधी करावी ?
शेतकऱ्यांसाठी सल्ला असा आहे की, ज्यांना कांदा, हरभरा किंवा गहू पेरायचा आहे, त्यांनी ५ नोव्हेंबरनंतर किंवा ७ नोव्हेंबरनंतर पेरणी सुरू करू शकता. द्राक्ष बागायतदारांनी आणि वीटभट्टी उत्पादकांनी देखील ७ नोव्हेंबरनंतर आपली कामे सुरू करावीत, कारण त्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबेल आणि चांगले सूर्यदर्शन होईल. – पंजाबराव डख