पावसाचा मुक्काम वाढला, या तारखेपर्यंत पाऊस.. नंतर थंडीची लाट – तोडकर हवामान अंदाज
तोडकर हवामान अंदाज ; मान्सून परतल्यानंतरही, सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय आहे. आज, २ नोव्हेंबर रोजी, बुलढाणा, अकोला, खामगाव, चिखली, मेहेकर या विदर्भातील भागांसह लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड आणि धाराशिव (उस्मानाबाद) या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, नाशिक आणि अहमदनगरसारख्या काही ठिकाणीही सरींची हजेरी असेल. ३ नोव्हेंबरला नाशिक, सातारा, सांगली, पुण्याचे घाटमाथे आणि त्र्यंबकेश्वर सारख्या भागांमध्ये हा पाऊस अधिक सक्रिय राहील.
एकूणच, सध्याची ही पावसाची परिस्थिती ४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर राज्यातून पावसाचा जोर हळूहळू कमी होईल आणि ८ ते ९ नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल, असा अंदाज तोडकर यांनी व्यक्त केला आहे.
थंडीला सुरुवात कधी ?
राज्यात पावसाळी वातावरण संपल्यानंतर ५ किंवा ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून थंडीचे आगमन होईल. ही थंडी ७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी जाणवायला लागेल. १० नोव्हेंबरच्या आसपास थंडीची तीव्रता दुप्पट वाढेल आणि दिवसादेखील थंडीचा कडाका जाणवेल. थंडीचा हा जोर साधारणपणे १० ते १२ दिवस टिकून राहील.
पेरणी कधी करावी ?
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला म्हणजे, हरभरा आणि गहू या रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी १० आणि ११ नोव्हेंबर ही सर्वात योग्य वेळ आहे. या तारखेपूर्वी पेरणी केल्यास अचानक पाऊस येऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुन्हा पाऊस येनार (गारपीट)🌧️
नोव्हेंबर महिन्यात पुन्हा २१ ते २५ तारखेच्या दरम्यान वातावरणात दुसऱ्या टप्प्यातील बिघाड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, डिसेंबर महिन्यातही हवामान पुन्हा खराब होणार असून, ५ ते ८ डिसेंबरच्या दरम्यान आणि नंतर १९ डिसेंबरच्या आसपास पाऊस आणि गारपिटीचे रडार मॉडेलमध्ये दिसत आहेत. त्यामुळे, या वर्षी गारपिटीचा धोकाही कायम आहे. दीर्घकालीन अंदाजानुसार, प्रशांत महासागरातील ‘ला-निना’ स्थिती जास्त काळ सक्रिय राहिल्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये (२०२७ पर्यंत) एकदा तरी तीव्र दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.