मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्रासह या राज्यांना अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘मोंथा’ नावाच्या तीव्र चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाने मंगळवारी रात्री आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली असून, ते आता आंध्रप्रदेशातून पुढे सरकण्यासाठी सुमारे तीन ते चार तास घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या वादळाची प्रचंड तीव्रता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा (अलर्ट) जारी केला आहे. किनारी भागात ताशी ११0 किमी वेगाने वारे वाहत असून, सोमवारपासूनच मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत.
वादळाची सद्यस्थिती आणि इतर राज्यांवरील प्रभाव
गेल्या सहा तासांत ‘मोंथा’ चक्रीवादळ १७ किमी प्रति तास वेगाने वायव्येकडे सरकले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ मच्छिलीपट्टणम, काकीनाडा आणि विशाखापट्टणमपासून काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या चक्रीवादळाचा परिणाम केवळ किनारपट्टीवरील राज्यांवरच मर्यादित नसून, त्याचा प्रभाव तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांवरही जाणवण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे प्रशासनाने लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
चक्रीवादळाच्या धोक्यामुळे आंध्रप्रदेश सरकारने अनेक महत्त्वाचे प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आहेत. कृष्णा, एलुरू, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, काकीनाडा यासह सात चक्रीवादळग्रस्त जिल्ह्यांमध्ये वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही वाहतूक बंदी बुधवार रात्री ८:३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असेल. रात्रीच्या या संचारबंदीतून केवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवांनाच सूट देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे, अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गांसह सर्व रस्ते वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रातील संभाव्य परिणाम
मोंठा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या हवामानावरही अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांमध्ये पुण्यासह राज्यभरात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ऑक्टोबर अखेरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती, त्याच अनुषंगाने या चक्रीवादळामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस अपेक्षित आहे.