राज्यातून पाऊस माघार घेणार, थंडीची सुरुवात होनार…पंजाब डख हवामान अंदाज
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राज्यातून पावसाचा जोर आता कमी होणार आहे. आज (३१ ऑक्टोबर) फक्त भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात उत्तर महाराष्ट्राकडे थोडा जास्त जोर राहील. मात्र, उद्या १ नोव्हेंबर पासून राज्याच्या बहुतांश भागातून पावसाचा जोर लक्षणीयरित्या कमी होईल आणि सूर्यदर्शन चांगले होईल. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, बीड, परभणी आणि जालना यांसारख्या काही जिल्ह्यांमध्येच तुरळक पाऊस पडेल.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातून पाऊस ४ नोव्हेंबर पासून निघून जाण्यास सुरुवात होईल आणि ७ नोव्हेंबर पर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रातून कायमचा माघार घेईल.
धुई, धुके आणि थंडीचे आगमन
राज्यातून पाऊस जाताच वातावरणात मोठा बदल दिसून येणार आहे. ३ नोव्हेंबर पासून राज्यात थंड वाऱ्यांची सुरुवात होईल. याचबरोबर, १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान राज्यात धुई, धुके आणि धुरळीचे प्रमाण खूप वाढणार आहे. हे धुके इतके दाट असेल की रस्त्यावर वाहन चालवताना दिवसा गाडीच्या लाईट्सचा, विशेषतः पिवळ्या लाईट्सचा वापर करावा लागेल…
राज्यात थंडीची लाट आणि हिवाळ्याची चाहूल
पाऊस गेल्यानंतर लगेचच राज्यात थंडीची दमदार सुरुवात होणार आहे. ७ नोव्हेंबर पासून राज्यात सर्वत्र थंडी जाणवणार आहे. थंडीची पहिली लाट ४ ते ५ नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी आणि अमरावती या विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सुरू होईल. ही थंडी ६ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यापर्यंत पोहोचेल आणि ७ नोव्हेंबर पर्यंत सांगली, सातारा, सोलापूर या दक्षिण पट्ट्याकडे पसरेल. ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात थंडीचा प्रभाव जाणवेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने हिवाळ्याची सुरुवात झाल्यासारखे वाटेल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
राज्यात थंडी सुरू होत असल्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे; त्यांनी ७ नोव्हेंबर नंतर त्यांच्या औषधांची तयारी करावी. कांदा रोपे टाकणाऱ्या शेतकऱ्यांनीही आता रोपे टाकण्यास सुरुवात करावी. ज्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारीची पेरणी राहिलेली आहे, त्यांनी जसा वाफसा होईल तसे त्वरित पेरणी करावी. अलीकडील पावसामुळे बियाण्याला औषध लावून पेरण्याचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.