राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस… पंजाब डख
हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. सध्या सुरू असलेला हा पावसाचा मोठा टप्पा ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत राहणार असून, राज्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागांत हजेरी लावेल. या पावसाचा जोर लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे, विशेषतः काढणी झालेले सोयाबीन झाकून ठेवणे किंवा इतर आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करून सुरक्षितता बाळगावी, असा सल्ला डख यांनी दिला आहे…
राज्याच्या विविध भागांत पावसाचे प्रमाण वेगवेगळे राहील. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अधिक प्रभाव जाणवेल. यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर (औरंगाबाद), धाराशिव (उस्मानाबाद), सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या पट्ट्यात जास्त पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर पडेल असा तर काही ठिकाणी पेन्डवलचा पाऊस अपेक्षित आहे, मात्र मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहील असे पंजाब डख म्हनाले..
सध्याचा पावसाचा टप्पा संपल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागेल. २ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होईल, असा पंजाब डख यांचा अंदाज आहे. थंडीची सुरुवात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांतून होणार आहे. जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, निफाड, मलकापूर, जळगाव जामोद, नांदोरा, परतवाडा, अकोट, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये थंडीचे थंड वारे सुटण्यास सुरुवात होईल.
पाऊस थांबल्यानंतर लगेचच (ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यानंतर) वातावरण निवळेल आणि अनेक ठिकाणी दाट धुके किंवा धुई पाहायला मिळेल. दरम्यान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात पाऊस सुरू असल्याने, महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये (उदा. लातूर, नांदेड, सोलापूर) पावसाळी वातावरण पूर्णपणे कमी न होता, हलक्या स्वरूपात कायम राहू शकते अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.










