रामचंद्र साबळे ; रब्बी पिकांवर संकट, हवामान बदलामुळे पुढील काळातही पाऊस…
महाराष्ट्रावर आजपासून गुरुवार (ता.२ ते ६) `या ५ दिवसांच्या कालावधीत हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके वाढतील. तसेच शुक्रवार (ता.७) शनिवारी (ता.८) हवेच्या दाबात आणखी वाढ होऊन ते १०१२ हेप्टापास्कल इतके होताच, थंडीत वाढ होण्यास सुरुवात होईल. बहुतांश काळ पावसात उघडीप राहील. तर काही वेळा हलक्या पावसाची शक्यता राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलाय…
अद्यापही बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस आणि हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वाढलेला वेग कायम राहील. त्यातून बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि ढग निर्मितीचे काम चालूच राहील.
दुसऱ्या बाजूस प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १४ अंश सेल्सिअस आणि इक्वेंडोरजवळ २४ अंश सेल्सिअस थंड राहण्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव कायम राहील. यावरून पुढील काळात हवामान पुन्हा अस्थिर होणे शक्य आहे. ही स्थिती कायम राहिल्यास नोव्हेंबर महिन्यातही वातावरणात बदल जाणवणे शक्य आहे. मात्र वाढलेले हवेचे दाब कायम राहिल्यास हवामान स्थिर राहील असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला.
या वर्षी हवामान बदलामुळे अधूनमधून पावसाची स्थिती कायम होती. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः खरीप हंगामातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी काळात बदलत्या हवामानानुसार शेती व्यवस्थापन करणे जरुरीचे ठरणार आहे.
रब्बी हंगामात थंडीचा कालावधी नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा ४ महिन्यांचा असतो. थंडीचे प्रमाण वाढताना सकाळी थंडी व दुपारी उष्ण हवामान आणि त्यानंतर १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत अतिथंडीचा काळ राहील. पुन्हा १५ जानेवारीनंतर थंडीचा कालावधी कमी होत जाऊन पहाटे व सकाळी चंडी व दुपारी उष्ण हवामान अशी स्थिती राहील. (रामचंद्र साबळे)