मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: आँक्टोंबरचा हप्ता येनार खात्यात
राज्यात लवकरच होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी असणारी केवायसी (KYC) करण्याची अट शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयावर राज्य शासन विचार करत असून लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
या योजनेची केवायसी प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाली आणि साधारणपणे दोन महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे, लाभार्थ्यांच्या घरात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत का, तसेच एका घरामध्ये किती महिला लाभार्थी आहेत आणि त्यांची जात प्रवर्ग काय आहे, या सर्व बाबी तपासण्याचा शासनाचा हेतू होता.
केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. योजनेचे पोर्टल व्यवस्थित सुरू नसणे, त्यामुळे महिलांना रात्री-अपरात्री केवायसी करावी लागणे, अशा समस्या समोर आल्या. विशेषतः विधवा महिला, अविवाहित मुली आणि ज्यांच्याकडे वडील किंवा पती यांचे आधार कार्ड उपलब्ध नव्हते, अशा अनेक महिलांना केवायसी पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या.
तसेच, पडताळणी प्रक्रियेमुळे गेल्या काही महिन्यांपासून हप्ते न आल्याने, लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. केवायसी केल्यानंतर हप्ते बंद होतील की काय, अशा चर्चांमुळे महिलांचा रोष वाढत होता. हा वाढता रोष आणि आगामी निवडणुका लक्षात घेता, महिला व बाल विकास विभागामार्फत केवायसीच्या मुदतवाढीवर आणि शिथिलतेवर गांभीर्याने विचार सुरू आहे.
सध्या तरी केवायसी करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत, म्हणजे पुढील काही महिन्यांसाठी, केवायसीची अंतिम तारीख दिली जाणार नाही आणि ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल (ऑक्टोबरचा हप्ता) माहिती देताना, तो दिवाळी किंवा भाऊबीजेला दिला जाईल अशा चर्चा होत्या. मात्र, अद्यापही आवश्यक निधीचे वितरण विविध विभागांकडून झालेले नाही. तरीसुद्धा हप्ता वितरणासाठीचा जीआर (GR) निर्गमित होण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थकीत असलेला हा हप्ता महिला लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.










