शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले…
शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्यासोबत आज राज्य सरकारची सकारात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आणि बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला याबाबतही सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले? –
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही मागील काळात एक समिती तयार करून, कर्जमाफी कशी करायची?, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या? अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण, कर्जमाफी हा एक भाग आहे. पण शेतकरी वारवार कर्जाच्या विळख्यात अडकतो, म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो? अशाप्रकारचा सगळा विचार व्हावा, अशी अपेक्षा होती. ”
”त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत, प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे. ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशापद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसं ठेवता येईल?, थकीत कर्जात तो जाणार नाही, याकरिता काय उपाययोजना करता येतील? सगळ्या बाबींवर निर्णय करेल.”
”या संदर्भात आम्ही असा निर्णय केलाय की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे, या संदर्भातील एक अहवाल द्यावा. या अहवालावर कर्जमाफीसंदर्भातील जो निर्णय आम्हाला करायचा आहे, तो तीन महिन्यात म्हणजेच ३० जून २०२६ पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे.”
”त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत त्यांनीही याला मान्यता दिलेली आहे. आम्ही त्यांना हे समजावून सांगितलं की, आम्ही पहिल्या दिवसापासून कर्जमाफीच्या बाजूने आहोत. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हे त्यांना सांगितलेलं आहे.”
”परंतु आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं आवश्यक आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले नाहीत. तर शेतकरी रब्बीचा पेरा देखील करू शकत नाहीत. म्हणून पहिल्यांदा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जे पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे.”