या तारखेपासून सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणी सुरू होनार
सोयाबीनच्या हमीभावाचा (MSP) विषय विरोधी पक्षाने उपस्थित केल्यानंतर, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यावर उत्तर देण्यात आले आहे. या घोषणेनुसार, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला सोयाबीनचा माल हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकू नये, त्याऐवजी तो हमीभाव केंद्रांवर शासनाला विकावा.
शासनाने हे आवाहन केले असले तरी, शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. खरीप हंगाम पूर्णपणे हातून गेल्यामुळे आणि सध्या पैशाची तीव्र निकड असल्याने, शेतकरी जास्त काळ वाट पाहू शकत नाहीत; सोयाबीन विकल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. जर त्यांना पीक नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणात मिळाली असती, तर त्यांनी काही काळ थांबण्याची तयारी दर्शवली असती.
नोंदणी सुरू झाल्यावरही, मालाची खरेदी सुरू होणे, नंबर लागणे, आणि त्यानंतर चुकारे होणे ही एक दीर्घ आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या प्रक्रियेचा फायदा व्यापाऱ्यांना होण्याची शक्यता अधिक आहे, कारण ते शेतकऱ्यांकडून कमी भावाने सोयाबीन घेऊन नंतर तेच सोयाबीन हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर विकू शकतात.
सध्याच्या राज्यातील परिस्थिती पाहता, हमीभाव केंद्रावर खरेदी करण्याऐवजी, मध्य प्रदेश सरकारने लागू केलेल्या ‘भावांतर योजने’ सारखी योजना महाराष्ट्रात राबवणे अधिक गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्वरित दिलासा मिळू शकेल… केवळ आपल्या गरजेनुसारच माल विकावा आणि उर्वरित माल जपून ठेवावा. संयम ठेवल्यास, एकतर हमीभावाने विक्रीची संधी मिळेल किंवा बाजारात सोयाबीनचा पुरवठा कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना आपोआप भाववाढ करावी लागेल. विरोधी पक्षाने या विषयावर आवाज उठवल्यामुळेच ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासंबंधीचे पहिले पाऊल उचलले गेले आहे.