बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ घोंगावतंय, राज्यात वादळी पाऊस
बंगालच्या उपसागरातील अयी दाबाच्या क्षेत्राचे लवकरच वादळात रूपांतर होणार असून, 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हे वादळ आंध्र किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या वादळाला मोनथा हे नाव देण्यात आले आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचं सोमवारी पहाटे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे.उत्तर पश्चिमेकडे प्रवास करीत याची मंगळवारपर्यंत आणखी तीव्रता वाढणार आहे. मंगळवारी सायंकाळी आंध्र मधील मछलीपट्नम आणि कलिंगपटनम दरम्यान हे वादळ किनारपट्टीला धडकनार आहे. यामुळे सोमवारपासूनच आंध्र, रायलसीमा आणि ओरिसा राज्यात सतर्कतेची सूचना असून, रेड अलर्ट देण्यात आला आहे.या दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना आहे.
अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर पश्चिमेकडे ते प्रवास करीत आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.
आज (ता. २६) राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.
आज (ता.२६) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.