चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात एवढे दिवस पावसाचा जोर कायम
तोडकर हवामान अंदाज ; सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्री स्थिती (वादळी वातावरण) निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील हवामान मोठ्या प्रमाणावर अस्थिर झाले आहे. याचा परिणाम म्हणून खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे, तर विदर्भ आणि खानदेशात काही ठिकाणी वाहत्या पावसाची नोंद झाली.
आजही (२६ ऑक्टोबर) मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, अहिल्यानगर, कोल्हापूर यांसह मुंबई परिसरात पावसाची शक्यता कायम आहे. पावसाचे स्वरूप काळ्या कुट्ट आभाळांच्या फळ्यांसह काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा असेल, जो दिवसा मावळताना किंवा रात्री उशिरापर्यंत दाखल होऊ शकतो अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.
—
तोडकर यांच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील वादळी स्थिती गुजरातकडे सरकत असल्यामुळे खानदेशात अजून आठवडाभर पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो. याव्यतिरिक्त, बंगालच्या उपसागरात २७ आणि २८ ऑक्टोबरच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र (लो प्रेशर) तयार होत आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्याने पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भावर होईल.
या काळात नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हे अस्थिर पावसाळी वातावरण साधारणतः ३० ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राहील. मात्र, या काळात पाऊस सार्वत्रिक नसेल. ढगाळ वातावरण राहून ‘कुठे पडेल आणि कुठे नाही’ अशा स्वरूपात ठीक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
—
नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास, निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातही हवामान पूर्णपणे स्थिर होण्याची चिन्हे नाहीत. बंगालच्या उपसागरात ४ आणि ५ नोव्हेंबरच्या सुमारास पुन्हा चक्रीवादळी स्थिती तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे त्या काळातही काही भागांमध्ये पावसाचे सावट राहू शकते असा अंदाज तोडकर यांनी व्यक्त केला आहे.
एकंदरीत, खराब हवामान साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू राहू शकते आणि त्यानंतर पावसाच्या शक्यतांमध्ये मोठा विराम (गॅप) मिळेल. थंडीची सुरुवातही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या सर्व अस्थिर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतःच्या स्थानिक परिस्थितीनुसार आणि अनुभवानुसार घ्यावा, असा सल्ला हवामान तज्ञांनी दिला आहे. सध्या तापमान कमी होणार असल्याने गारपिटीची शक्यता कमी आहे. (तोडकर हवामान अंदाज)