रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ, प्रतिबॅगमागे इतकी दरवाढ…पहा खतांचे नवे दर..
शेतकरी आधीच अतिवृष्टी, बाजारभावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना, आता रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. ऐन हंगामात खतांच्या भावात अचानक दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खतांमध्ये प्रतिबॅगमागे २०० ते ३०० रुपये इतकी दरवाढ झाली आहे. विविध मिश्र खतांचे दर वाढले, परंतु शेतीमालाचे भाव अजूनही म्हणावे तसे वाढले नाहीत.
कांदा, कापूस, सोयाबीन, भाजीपाला अशा प्रमुख पिकांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हंगामाचा हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. आता रब्बी हंगाम पुढे येऊन ठेपला आहे. गहू, हरभरा आदी पिकांना खताची गरज भासणार आहे. येणाऱ्या काळात अजूनही पुन्हा खताच्या दरात वाढ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कृषी विक्रेत्यांना विविध कंपन्यांकडून खतांसोबत वॉटर सोल्यूबल खते, मायक्रोला, मायक्रोराइझा आदींचे लिंकिंग केले जाते. शेतकऱ्यांकडून या लिंकिंग प्रॉडक्टचा उठाव नसल्याने तो माल इतर खतांसोबत माथी मारला जातो. युरिया खत २६६ रुपयांवर विक्री करू नये, असे निर्देश आहे. परंतु, युरिया वाहतुकीसाठी भाडे देत नसल्याने प्रत्येक पोत्यामागे दहा ते वीस रुपये जादा दराने दुकानदारांना नाइलाजाने विक्री करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहेत.
जादा दराने विक्री झाल्यास शेतकऱ्यांकडून ही ओरड केली जाते. लिंकिंगमुळे दुकानदारांकडूनही मोजक्याच खताचा उठाव केला जातो. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चात सर्वांत महत्त्वाचा घटक असणाऱ्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेतीक्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. केंद्र सरकारने खतांचे दर कमी करावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
रासायनिक खतांच्या दरात झालेली वाढ ही केंद्र सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणांचा पुरावा आहे. वास्तविक 2024 पासून मोदींनी सरकार आल्यानंतर रासायनिक खतांचे दर हे कित्येक पटींनी वाढले आहे. त्यात आता नव्याने झालेली ही वाढ शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. सरकारने रासायनिक खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे खत वापरण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. शेतीमालाचे बाजारभाव वाढवण्याची गरज असताना रासायनिक खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.
-सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, काँग्रेस नेते











