नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज, पंजाब डख यांनी वर्तवला अंदाज
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला (साधारणपणे ४ नोव्हेंबरपर्यंत) राज्यात काही ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत पडेल आणि हा हंगामातील शेवटचा विखुरलेला पाऊस असेल. जळगाव, बुलढाणा, संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये या पावसाचा अनुभव आला आहे. मात्र, ५ नोव्हेंबरपासून राज्यातून पाऊस कमी होण्यास सुरुवात होईल आणि साधारणपणे ७ ते ८ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस थांबून हवामान कोरडे व निरभ्र होईल.
रब्बी पेरणी आणि थंडीची सुरुवात
पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी जशी जमिनीची वापसा होईल, तशी लगेच रब्बी पेरणी सुरू करावी. सुमारे ७ ते ८ नोव्हेंबरपासून पेरणीसाठी योग्य आणि पोषक वातावरण तयार होईल. शेतकरी कांद्याचे रोप, हरभरा आणि गहू या पिकांची पेरणी करू शकतात. (पंजाब डख)
त्याचबरोबर, पावसाळी वातावरण निवळताच राज्यात थंडी आणि धुक्याला (धुई) सुरुवात होईल. ४ नोव्हेंबरपासून काही भागांत धुक्याची चाहुल लागेल आणि ५, ६, ७ नोव्हेंबरच्या दरम्यान ते खूप दाट असेल. ५ नोव्हेंबरपासून नंदुरबार, जळगाव, धुळे या पट्ट्यांमध्ये थंडी जाणवेल, तर ८ नोव्हेंबरपर्यंत ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल, आणि पुढे थंडी चांगली राहील. (पंजाब डख)
फळबाग धारकांसाठी सल्ला व पुढील अंदाज
नोव्हेंबरमध्ये यानंतर राज्यात पुन्हा मोठा पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि कापूस वेचणीसारखी कामे निर्धास्तपणे करावीत. तसेच, द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे: ४ ते ५ नोव्हेंबरपासून चांगले सूर्यदर्शन (ऊन) अपेक्षित आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांची फवारणीची कामे थांबली होती, त्यांना फवारणी करण्यासाठी योग्य वातावरण मिळेल. पुढील काळात, डिसेंबरमध्ये पाऊस नसून, त्यानंतर थेट फेब्रुवारीच्या अखेरीस (२०२६ मध्ये) गारपीट होण्याची शक्यता डख यांच्या कडून वर्तवण्यात आली आहे.