पुन्हा नवीन कमी-दाब क्षेत्र तयार, नोव्हेंबरमध्येही पाऊस… मानीकराव खुळे
मान्सून पूर्णपणे परतल्यावरही, दोन्हीही समुद्रातील प्रणाल्याच्या परिणामातून गेल्या १०-१२ दिवसात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली.. आता महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरु असली तरी, मुंबईसह संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात मात्र अजूनही आज ३ नोव्हेंबर ला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही जाणवतेच असा अंदाज मानीकराव खुळे यांनी दिलाय.
बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाचे अवशेष काल दि. १ नोव्हेंबरला हिमालयीन प. बंगाल मध्ये विरळले तर, अरबी समुद्रातील डिप्रेशन उद्या गुजराथ मधील कच्छच्या आखातात विरळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (मानीकराव खुळे)
आज विशेषतः मुंबई उपनगर ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे नाशिक जळगांव छ. सं. नगर, उत्तर अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर सांगली सोलापूर ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल.
त्यापुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. ६ नोव्हेंबर पर्यन्त केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता असुन शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर पासुन काही दिवसाकरता पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते.
शनिवार दि. ८ नोव्हेंबर पासुन हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता जाणवते. असे असले तरी, लगेचच नाही परंतु नोव्हेंबर महिन्यात, महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता अजूनही पुढे नाकारता येत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात अतिजोरदार थंडीची शक्यताही सध्या जाणवणार नाही, असे वाटते.वातावरणातील बदलानुसार नोव्हेंबर मधील थंडी व पावसाबद्दल तसे आगाऊ अवगत केले जाईल अशी माहिती खुळे यांनी दिली.
आज बं. उपसागरात ब्रम्हदेश व बांगलादेश किनारपट्टीदरम्यान पुन्हा एक नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असुन पुढील २ दिवसात त्या किनारपट्टीनेच ते वायव्ये दिशेकडे सरकण्याची शक्यता जाणवते.
आज इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.