अतिवृष्टी नुकसान भरपाई: अखेर सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण, वाढीव मदतीला मंजुरी…
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसंदर्भात राज्य शासनकडून एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. अखेर राज्यातील सर्वच्या सर्व ३४ जिल्ह्यांमधील नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मर्यादा वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी नुकसान भरपाई केवळ दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मंजूर करण्यात आली होती, मात्र आता यात वाढ करत ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या वाढीव मर्यादेतील मदतीसाठी शासनाने सुमारे ६४८ कोटी १५ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या ७३०० कोटी रुपयांच्या निधीसह, आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण ८,००० कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
एक हेक्टरच्या वाढीव भरपाईसाठी राज्यातील एकूण ६ लाख १२ हजार १७७ शेतकरी पात्र ठरले आहेत. विभागीय स्तरावर या निधीचे वितरण करण्यात आले असून, यात छत्रपती संभाजीनगर (बीड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड), अमरावती (अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम), नाशिक (नाशिक, जळगाव, अहिल्यानगर) आणि पुणे (सोलापूर, सांगली) या विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे नुकसान भरपाईच्या वितरणाला आता गती मिळाली आहे. वाढीव एक हेक्टरच्या मर्यादेतील मदत अनेक जिल्ह्यांमध्ये त्वरित वितरित करण्यास सुरुवात झाली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
आगामी दिवाळी सणापूर्वीच ही सर्व मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही ८,००० कोटी रुपयांची मदत मोठा आधार ठरणार आहे, ज्यामुळे त्यांना झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यास मोठी मदत मिळेल…