पाऊस घेनार निरोप ; डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, बुधवार, ५ नोव्हेंबर ते शुक्रवार, ७ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. या काळात हवेचा दाब १०१० हे पास्कल इतका राहील, ज्यामुळे काही ठिकाणी अल्प स्वरूपात पावसाची शक्यता जाणवेल.
मात्र, शनिवार, ८ नोव्हेंबरपासून हवामानात मोठा बदल होणार असून, हवेचा दाब वाढल्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल आणि थंडीची सुरुवात होईल. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीपर्यंत थंडीचा चांगला कालावधी राहील, ज्यामुळे हिवाळी हंगाम सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल. शनिवारपासून आकाश निरभ्र होऊन चांगला सूर्यप्रकाश मिळेल आणि हवामान स्थिरतेकडे वाटचाल करेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय..
रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, बुधवार ते शुक्रवार या काळात महाराष्ट्राच्या अनेक विभागांमध्ये १ ते ९ मिलिमीटरपर्यंत अत्याल्प स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो फारसा जोराचा नसेल. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २ ते ९ मि.मी. पावसाची शक्यता असल्याने भात काढणीचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, धुळे, जळगाव), मराठवाडा (धाराशीव, लातूर, नांदेड, जालना) आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये (बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा) १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे/अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ३ ते ९ मि.मी. पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढलेल्या हवेच्या दाबामुळे शनिवारपासून पाऊस पूर्णपणे थांबेल. (रामचंद्र साबळे)
रबी हंगामासाठी कृषी मार्गदर्शन
सध्याचे हवामान रबी हंगामातील पेरणीसाठी अत्यंत अनुकूल आहे. शेतकऱ्यांनी त्वरित गव्हाची पेरणी पूर्ण करून सारे व पाठ पाडावेत. त्याचप्रमाणे, हरभऱ्याची पेरणी उरकून घ्यावी, यासाठी विकास, विश्वास, दिग्विजय यांसारख्या चांगल्या वाणांची निवड करावी.
मागील जास्त पावसामुळे यंदा हरभरा पिकात मर रोगाची शक्यता कमी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मोहरीची पेरणी देखील करावी. पूर्व हंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या फुलांची विक्री बाजारात करावी. एकूणच, सध्याची स्थिती रबी हंगाम चांगला जाईल असे दर्शवते. (साबळे)