अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी ..! शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, २०१७ अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांचा लाभ प्रलंबित होता, त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदान म्हणून २५,००० रुपये देण्याची तरतूद होती. परंतु, २०१९ मध्ये नव्याने कर्जमाफी योजना जाहीर झाल्यामुळे, या योजनेतील प्रक्रिया खंडित झाली आणि राज्यातील सुमारे ६.५ लाख शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होते आणि शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते.
या वंचित शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला. अनेक शेतकऱ्यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाने या याचिकांवर सुनावणी घेत, पात्र याचिकाकर्त्यांना सदर योजनेचा लाभ तात्काळ देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, शासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, ज्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिकाही दाखल झाली. त्यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा कठोर निर्देश देत, सहा आठवड्यांच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.












