रब्बी पीक विमा योजना २०२५: अर्ज प्रक्रिया सुरू, हि आहे शेवटची तारीख…
राज्यात रबी हंगाम २०२५ करिता केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) लागू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राबवली जात आहे. राज्यात राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करून, एआयसी ऑफ इंडिया (AIC of India) आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड (ICICI Lombard) या कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जात आहे.
सध्या धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीद्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज स्वीकारले जातील.
रब्बी हंगामासाठी एकूण सहा प्रमुख पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. यात रबी ज्वारी (जिरायत आणि बागायत), गहू (जिरायत आणि बागायत), हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी धान यांचा समावेश आहे. या पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. रबी ज्वारीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे.
हरभरा, गहू आणि रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या दोन पिकांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या विहित मुदतीत या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. हा आयडी आधार क्रमांकाद्वारे आपोआप घेतला जाईल. शेतकरी त्यांच्या जवळच्या सीएससी सेंटर, योजनेसाठी नियुक्त एजंट्स किंवा कर्जदार शेतकरी थेट त्यांच्या बँकेच्या माध्यमातून विमा अर्ज भरू शकतात. ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असल्याने, कर्जदार शेतकऱ्याला योजनेत सहभागी व्हायचं नसल्यास तसे पत्र बँकेला देऊन तो बाहेर राहू शकतो.
अर्ज भरताना सातबारा उतारा, पीक पेरा माहिती, बँकेचे पासबुक आणि सामायिक क्षेत्र असल्यास सहमतीपत्र (बॉन्ड) ही कागदपत्रे जोडावी लागतात. या योजनेत नुकसानीची भरपाई पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे निश्चित केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.